वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बंगळुरुच्या संघात दाखल   

बंगळुरु :आयपीएलच्या उर्वरित पर्वासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिलासा मिळाला आहे. आरसीबीच्या संघात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड पुन्हा दाखल होणार आहे.
 
आयपीएल २०२५ भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावामुळं स्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळं अनेक विदेशी खेळाडू त्यांच्या मायदेशी गेले होते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीची लढत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात होणार असल्यानं त्या देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये परतणार का हा सवाल उपस्थित झाला होता.
 
आयपीएल १७ मे पासून पुन्हा सुरु होणार आहे.आरसीबी आणि केकेआर यांच्यात पहिली मॅच होणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्या  संघामध्ये आयपीएल खेळणारे खेळाडू आहेत. त्यामुळे या संघांचे  खेळाडू भारतात परतणार का असा सवाल निर्माण झाला होता.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड आरसीबीकडून खेळण्यासाठी भारतात परतणार आहे.  आरसीबीकडून त्याच्या भारतात परतण्यासाठी व्यवस्था केली जात आहे, अशी माहिती स्पोर्टस्टारच्या सूत्रांनी दिली.
 
हेझलवुड खांद्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर जाऊ शकतो, अशा चर्चा होत्या. मात्र, तो पुन्हा संघात दाखल होणार आहे.जोश हेझलवुडने आरसीबीसाठी १० मॅचमध्ये १८ बळी घेतल्या आहेत. या हंगामात सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यातीत तो तिसर्‍या स्थानावर आहे. हेझलवुड परत आल्यानं आरसीबीची विजेतेपद मिळवण्याच्या दिशेनं वाटचाल होते का ते पाहावं लागेल. विराट कोहली आरसीबीकडून १८ हंगाम खेळतोय. आरसीबीला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळालं नाही. यंदाच्या हंगामात आरसीबीला विजेतेपद मिळतं का ते पाहावं लागेल.

Related Articles